पाणीपुरवठ्यासाठी महिलांचा आंदोलनाचा इशारा

Foto
 वाळूज, (प्रतिनिधी): सिडको वाळूज -महानगर, महानगरातील सारा वृंदावन सोसायटी तसेच परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात आठव्या दिवशी नळाला अत्यल्प प्रमाणात पाणी आले. यामुळे बुधवारी (दि. २४) महिलांनी रिकामे हंडे डोक्यावर घेऊन दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात यावा, पाणी सोडण्याची वेळ निश्चित करण्यात यावी, अशी मागणी केली.

सिडको वाळूज महानगरातील सारा वृंदावन सोसायटीमध्ये १४७घरे असून, येथील लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे. पूर्वी या भागात सिडकोकडून आठवड्यामधून सोमवार तसेच शुक्रवार या दिवशी मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असे. मात्र काही दिवसांपासून पाच-सहा दिवसांआड तेही अत्यल्प प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.

त्यात बुधवारी आठ दिवसांनंतर नळाला कमी दाबाने पाणी आले. यामुळे संतप्त महिलांनी डोक्यावर रिकामे हंडे घेऊन पाणी सोडण्याची वेळ निश्चित करा, या भागात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करून ४० मिनिटांऐवजी किमान तासभर पाणी सोडण्यात यावे नसता सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा सचिव सुनीता आहिरे, मीना मुंढे, सविता हिरे, स्वाती जाधव, लता जाधव, साधना शेळके, उषा केदार, योगिता कदम, सुमन राठोड, संगीता महामुनी यांच्यासह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.